राहुल गांधींच्या टी-शर्ट, बुटांचा ब्रँण्ड कोणता? भाजपचं ट्विट आणि चर्चांना उधाण !!

महाराष्ट्रात जसे शिवसेना आणि भाजप यांचं राजकारण चर्चेत आहे त्याचप्रमाणे देशाची राजधानी दिल्लीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगलेला आहे. राज्यात ठाकरेंची शिवसेना पक्ष बांधणी आणि जनाधार वाढविण्याचा प्रयत्न करतेय त्याचप्रमाणे दिल्लीत काँग्रेसने पक्ष बांधणीला आणि पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी कंबर कसलीय.त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू झालीय. या यात्रे दरम्यान राहुल गांधी 3570 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. आता खरंतर भारत जोडो यात्रा तसेच राहुल गांधी ही यात्रा कशा प्रकारे पुढे नेत आहेत याकडे चर्चा व्हायला हवी. पण चर्चा होते आहे राहुल गांधी यांच्या टी शर्ट आणि बुटांची. राहुल गांधी या यात्रेत टीशर्ट आणि पँन्टमध्ये दिसत आहेत. यात्रेपेक्षा लोकांचं त्यांच्या बुटाकडे जास्त लक्ष जातंय. काहींनी तर त्या बुटाची किंमत किती आहे हे काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय. भाजपने तर एक पाऊल पुढे टाकत त्या टी-शर्टची किंमत सांगून लोकांच्या उत्सुकतेला हवा देण्याचं काम केलंय.
भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर राहुल गांधी यांचा टी शर्ट घातलेला एक फोटो आणि दुसऱ्या बाजूला एका टी-शर्टचा फोटो अशी पोस्ट केली आहे. तो टी-शर्ट कोणत्या ब्रँडचा आहे आणि त्या टी-शर्टची किंमत किती आहे हे सुद्धा त्यात लिहिलं आहे. राहुल गांधी यांनी ब्रिटिश लग्जरी फॅशन ब्रँड Burberryचा पोलो टी-शर्ट घातला आहे. त्याची किंमत 41 हजार 257 रुपये आहे, असं भाजपच्या ट्विटमधून स्पष्ट होतं. तसेच भारत, पाहा, असं ट्विट करून भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. भाजपच्या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.श्रीमंत घरात जन्माला येणे पाप आहे का किंवा राहुल गांधी हे डिर्जव करतात असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आजचा तिसरा दिवस असून त्यांनी भाजप आणि संघावर टीका केलीय.