Dasara Melava : शिंदेंना बीकेसी मैदान, उद्धव ठाकरेंचे काय?

दसरा मेळावा यावरुन शिंदे आणि ठाकरे गटामध्ये मोठी चढाओढ पहायला मिळतेय. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरुन राज्यात राजकारण तापलेलं असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. बीकेसीच्या मैदानावर मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाचा अर्ज MMRDA कडून स्विकारण्यात आलेला आहे अशी माहिती मिळाली आहे. तर बीकेसीच्या दुसऱ्या मैदानासाठी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठीचा करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती आहे.
यामुळे शिंदेंचा मेळावा बीकेसी मैदानात होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंचा मेळावा कुठे होणार? असा सवाल उपस्थित होतो आहे. बीकेसीमधील दोन मैदाने कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येतात त्यातील एकासाठी शिंदे गटाने, तर दुसऱ्या मैदानासाठी शिवसेनेने अर्ज केला होता. शिंदे गटाने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता ते आरक्षित नव्हते, त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला. तर शिवसेनेने अर्ज केलेले मैदान एका खासगी कंपनीने आधीच
आरक्षित केले आहे त्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला अशी माहिती देण्यात येत आहे. यावर शिवसेनेचा खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली असून शिवसेनेला या निर्णयामुळे फरक पडत नाही. ते पहिले आले म्हणून त्यांना परवानगी दिली. याच नियमाने शिवाजी पार्कवर आम्हाला परवानगी मिळायला हवी. आम्ही शिवाजी पार्कसाठी आधी परवानगी मागितली आहे.असे सावंत म्हणाले आहेत.