दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे ‘टायमिंग’ साधणार ! ठाकरेंना कसा शह देणार? प्लानिंग ठरलं !

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. आपणच खरी शिवसेना हे जनतेला पटवून देण्यासाठी दोघांनी कंबर कसली आहे. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात जसा दोन्ही गटात संघर्ष सुरु आहे तसाच संघर्ष आता जमिनीवरही पेटला आहे असे वाटते आहे. यंदाच्या दसरा मेळाव्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे कारण शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडलेली आहे. शिवसेनेतील दोन गट आम्हीच खरे आहोत हे पटवून देण्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
शिवसेनेचा दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्कात तर शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर होतो आहे.दोघांनी जय्यत तयारी केलली आहे. उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गट टायमिंग साधण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी शिंदेगटाकडून रणनीती ठरवली जातेय. दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे यांच्यात भाषणांवरून एकमेकांवर कुरघोडी होणार यात शंकाच नाही. तेव्हा ठाकरे यांच्या भाषणानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषण करावं, अशी योजना शिंदे गटानं आखली आहे. शिंदेंनी ठाकरेंनंतर भाषण केल्यास त्यांना ठाकरेंच्या भाषणाला प्रत्युत्तर देता येईल. त्यांचे मुद्दे खोडून काढता येतील, असं शिंदे गटातील नेत्यांना वाटते आहे. उद्धव ठाकरेंचे भाषण रात्री ८च्या सुमारास सुरू होते. ते साधारण एक तासानंतर संपते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी रात्री ९ नतंर भाषणाला सुरुवात करावी अशी शिंदे गटाची योजना आहे.
२१ सप्टेंबरला जेव्हा गोरेगाव येथे ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी शिंदेंवर तोंडसुख घेतलं होतं. त्यानंतर शिंदे यांची पत्रकार परिषद दिल्ली येथे झाली होती. तेव्हा त्यांनी ठाकरेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. आता दसरा मेळाव्यात काय होतं ते पहावं लागेल.