कुणाच्या दसरा मेळाव्यात गर्दी जास्त?

महाराष्ट्राच्या राजकारणामधील इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे संपन्न झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवतिर्थावर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला. या मेळाव्यात कुणाच्या सभेसाठी गर्दी जमा होते त्यासंदर्भात चढाओढ होती.शिवाजी पार्कवर एक लाख तर बीकेसी मैदानावर दोन लाखांची गर्दी जमा होणार असा दावा करण्यात आला होता.
आता तसं पाहिलं तर शिवाजी पार्कची क्षमता ५५ ते ६० हजार लोकांची असून पोलिसांच्या अंदाजानुसार काही लोकं मैदानात तर काहीजण मैदानाच्या बाहेर थांबलेले होते. त्यामुळे शिवाजी पार्कवर ६५ हजारांच्या आसपास लोकं असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा पार पडला. या मैदानाची क्षमताही दीड लाखाच्या आसपास असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या सभेला ९० हजार ते १ लाखांच्या आसपास लोकं जमा झाले असावेत असा प्राथमिक अंदाज आहे असं सांगितलं जातंय.
तर मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते आले होते त्यांच्या मता नुसार ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला अडीच लाख लोकं तर शिंदे यांच्या मेळाव्याला अडीच ते तीन लाख लोकं आले असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला.