पुण्यात रंगलंय पोस्टरवॉर !!

पुणे आणि पुणेरी पाट्या यांच्याबद्दल आपल्याला माहित आहे पण सध्या पुण्यात पोस्टर वॉर रंगलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या पोस्टरवरून पुण्यात राजकीय चढाओढ सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. २२ जुलै रोजी दोन्ही नेत्यांचा वाढदिवस आहे त्यानिमात्ताने पुण्यात सगळीकडे त्यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आलेले आहेत. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर फडणवीस आणि पवार यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच चढाओढ पहायला मिळते आहे. दरम्यान अलका चौक येथे लावलेल्या पोस्टरची चर्चा सर्वात जास्त होतेय
‘बैठका होतील… ताफा दिसेल… पण…’
अलका चौक येथील बॅनर खास आहे कारण या पोस्टरमध्ये शुभेच्छा देताना राष्ट्रवादीने भाजपला चांगलेच डिवचले आहे. दोन्ही नेत्यांचे पोस्टर अगदी समोरासमोर दिसत आहेत. बैठका होतील… ताफा दिसेल… पण अशी धडाडी तिथे नसेल… एकच पालक अजित पवार, असा मजकूर अलका चौक येथील पोस्टरवर छापण्यात आला आहे. सत्तांतर झाल्यानंतर आता पुण्याचा पालक मंत्री कोण अशी चर्चा होती त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव समोर आले होते. म्हणूनच या बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादीने भाजपाला लक्ष्य केले आहे अशी चर्चा सुरु झाली आहे.
‘निष्कलंक नेतृत्व, निर्विवाद…’
आता अजित पवारांच्या समर्थकांकडून अशी बॅनरबाजी होत असताना फडणवीस समर्थक कसे बरे शांत राहतील. त्यांनी ही अगदी अजित पवार यांच्या पोस्टर समोर निष्कलंक नेतृत्व, निर्विवाद कर्तृत्व असे लिहित उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुणेकर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना चांगलेच ओळखून आहेत. पुण्यातील कोणताही प्रश्न असो राष्ट्रवादीची कुरघोडी आणि भाजपकडून त्याला प्रत्युत्तर हे सुरुच असते. आता या पोस्टरबाजीवर दोन्ही नेते काय म्हणतात ते पहावे लागणार आहे.