राहुल गांधींची सावरकरांवर टीका, पण अडकले उद्धव ठाकरे; फडणवीसांनी गाठलं खिंडीत !

अनेक राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या उद्धव ठाकरेंची डोकेदुखी अधिक वाढलेली आहे आणि त्याला कारण आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेले विधान ! राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वि. दा. सावरकरकर यांच्यावर टीका केलीय. आता राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खिंडीत पकडलंय.
सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासबोत राजकीय आणि कायदेशीर लढाई लढत आहेत. असे असतानाच भाजपने त्यांना घेरून धरलंय. भारत जोडो यात्रेत आज राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांवर टीका केली. राहुल गांधींनी सावरकरांवर गंभीर आरोप केले आहेत. यावर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंना खिंडीत गाठलंय.
राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांचे हस्तक होते. ते इंग्रजांकडून पैसे घेत होते, अशा अनेक गोष्टी ते सावरकरांबद्दल बोलले आहेत. राहुल गांधींचा मी निषेध करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना काँग्रेसनं यामुळे वारंवार अपमानित केले आहे, कारण सावरकरांच्या पाठिमागे मोठ्या प्रमाणात भारतातली जनता होती. स्वातंत्र्यानंतर जी राजकीय परिस्थिती होती, त्या परिस्थितीत जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसनं केलंय असा आरोप फडणवीसांनी केलाय.
या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना एक सवाल केला आहे. राहुल गांधी यांनी आज जे वक्तव्य केलं त्याचा उद्धव ठाकरे निषेध करणार आहेत की नाही. त्यांनी जी भारत जोडो की तोडो यात्रा त्यांनी सुरू केली आहे त्या यात्रेच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते पाठवणार आहेत का आणि राहुल गांधी यांनी जे विधान केलंय, त्याचं समर्थन ते करणार आहेत का याचं उत्तर आता कुठेतरी उद्धजी यांनी दिले पाहिजे असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना भूमिका मांडण्याचं आवाहन केले आहे.