कोण आहेत ते अदृश्य हात? कोणाला दिला फडणवीसांनी इशारा?

एकनाथ शिंदे सरकारने आज बहुमताचा प्रस्ताव जिंकला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारवर ज्या सदस्यांनी विश्वास टाकला त्यांचे आभार मानले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईल’या आपल्या विधानाची आठवण सभागृहाला करुन दिली. यावेळी त्यांनी टोलेबाजी केली. फडणवीस म्हणाले,”ज्यांनी माझी टिंगल केली, अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार. पण माझा बदला हा त्यांना माफ करण्याचा असेल,”
फडणवीस म्हणाले, “ज्या सदस्यांनी प्रस्ताव बहुमतानं पारीत व्हावा यासाठी अप्रत्यक्षपणे सभागृहाच्या बाहेर राहून सहकार्य केलं, त्या अदृश्य ‘हातांचे’ मी आभार मानतो. मी म्हणालो होतो जेव्हा सरकार जाईल तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ. आमची खंत होती जनतेने आम्हाला बहुमत दिले तर काहींनी ते हिरावून नेले. आज जनतेने दिलेल्या बहुमताचा आम्ही सन्मान करतो. एकनाथ शिंदेंच्या पाठीशी मी पूर्णपणे उभा राहिन. त्यांच्यात आणि माझ्यात दुरावा दिसणार नाही. आमची मैत्री नेहमीच कायम राहील,”
शिंदे हे 24 बाय 7 काम करणारा नेता आहे. शिंदे हे प्रचंड माणुसकी असणारा, सामान्य जनतेसाठी जीवाची परवा न करता काम करणारा नेता असल्याचे म्हणत फडणवीस यांनी शिंदेंचं कौतुक केलं. एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान फडणवीस यांनी ‘सभागृहाबाहेर राहून हा प्रस्ताव मंजूर करण्यात ज्यांनी मदत केली, त्या अदृश्य हातांचेही मी आभार मानतो, असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे विजय वडट्टीवार, आणि चव्हाण यांचे नाव उच्चारले… ते म्हणाले, वडेट्टीवार साहेब, चव्हाण साहेब.. आभार तर मानलेच पाहिजेत..’ एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे असे उघड दिसतेच आहे. मात्र अजूनही काही अदृश्य शक्तींचा या कारस्थानात सहभाग आहे. यात काँग्रेसही सहभागी असल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे हा टोला काँग्रेसला होता की काय, अशी चर्चा सुरु आहे