भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरु !!

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा असताना ऐनवेळी फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले होते. ही नाराजी आज पुन्हा एकदा नागपुरात पाहायला मिळाली
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आपल्या घरी नागपूरला पोहोचले. यावेळी विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत झालं. त्यानंतर रोड शो देखील काढण्यात आला. या रोड शोमध्ये फडणवीसांनी सर्वांचे आभार मानले. मात्र फडणवीसांच्या स्वागतासाठी आणि रोड शोसाठी लावण्यात आलेल्या बॅनरमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब होता.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून अचानक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रादाची संधी देण्यात आली. त्यामुळे फडणवीस बाहेर राहुन पक्ष संघटनेत काम करणार हे मानलं जात होतं. मात्र फडणवीसांना पुन्हा फोन करून उपमुख्यमंत्री पद घेण्याचे आदेश देण्यात आले. खुद्द अमित शहा यांनी दोन वेळा फडणवीसांना फोन केल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर पक्षादेश मानत फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
दरम्यान फडणवीसांना मुख्यमंत्रीपदासाठी डावलण्यात आल्याचे पडसात नागपूरमध्ये उमटले. स्वागताच्या बॅनरमधूनच अमित शहा यांचा फोटा गायब झाला आहे. बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, नितीन गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांचे फोटो आहेत. त्यामुळे फडणवीस समर्थक अमित शहा यांच्यावर नाराज असल्याचे अधोऱेखित झालं आहे.