धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा; म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माझा घात केला, इथून पुढे…

कोल्हापुरात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यामधील सत्तासंघर्ष पुन्हा पेटला आहे.आता कोल्हापुरात महाभारत होताना दिसणार आहे. तसे सुतोवाच राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेले आहेत. दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी एक वक्तव्य केलंय त्याची चर्चा होतेय. आमचे ठरले आहे असे म्हणत, लोकसभा निवडणुकित माझा घात केला आता इथून पुढे महाभारत होणार आणि वाईटाचा नाश होणार असा इशारा महाडिकांनी सतेज पाटील यांना दिला आहे.
कोल्हापुरमधील सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यामधील सत्तासंघर्ष २० दशकांपासून सुरु आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महाडिकांचे साखर कारखाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरही वर्चस्व निर्माण केलं होतं. त्यामुळे कोल्हापुरच्या राजकारणात एकतर्फी चित्र बघायला मिळत होतं. अगदी धनंजय महाडिकांची राजकिय कारकीर्द धोक्यात आली होती. पण मध्यंतरी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या विजयामुळेच कोल्हापूरच्या राजकारणात धनंजय महाडीक यांचे पुन्हा पुनर्वसन होण्यास मदत झालेली आहे.
राज्यसभा निवडणुकित धनंजय महाडिक यांना यश मिळाल्यानंतर भाजप आणि धनंजय महाडिक या दोघांची ताकद वाढली.याचा प्रभाव आता थेट निवडणुकिवर पडणार असा दावा भाजप आणि महाडिक गटाने केलेला आहे. याला सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं असून जे काही करायचे आहे ते निवडणुकिच्या रणांगणात करुन दाखवू. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात महाविकास आघाडीचाच विजय झाला आहे असे सांगत भाजपची ताकद नगण्य आहे असा उल्लेख सतेज पाटील यांनी केलेल आहे. सतेज पाटील यांच्या आव्हानालाच खासदार धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिलेले आहे.