सरनाईक तर सुटले, राऊतांच्या जामिनाला ED चा विरोध का?

महाराष्ट्रात मध्यंतरी ईडीचा ससेमिरा राजकीय नेत्यांवर मोठ्या प्रमाणात लागला होता. त्याच काळात शिंदेंनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि राज्यातील मविआ सरकार कोसळलं. ईडीपासून सुटका व्हावी म्हणून नेते मंडळी शिंदे गटात गेली आणि त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली अशी चर्चा होती. पण काही अर्थाने ही चर्चा खरी झाली असेच म्हणायला हवे कारण शिवसेनेसोबत बंडखोरी करुन शिंदेगटात गेलेल्या प्रताप सरनाईक यांना शिंदे गट चांगलाच फलदायी ठरलेला आहे.
टॉप्स समूह घोटाळा प्रकरणाच्या आधारेच ईडीने प्रताप सरनाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. ईडी सरनाईक यांच्या घरापर्यंत पोहोचली होती पण आता महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तपास बंद करण्याचा अहवाल स्वीकारल्याने सरनाईक यांच्यामागील ईडीचा ससेमिरा थांबण्याची शक्यता आहे. सरनाईक यांच्यासंबंधित न्यायालयाने सी समरी अहवाल स्वीकारल्याने मूळ गुन्हा रद्द झालाय. त्यामुळे पीएमएलए अंतर्गत ईडीने दाखल केलेला गुन्हा टिकू शकत नाही. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यातून सरनाईक यांची सुटका होणार आहे.ईडिला २१ सप्टेंबरपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आता सरनाईकांचा ईडी प्रश्न मार्गी लागलाय पण संजय राऊत यांचे काय?
पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत तुरुंगात आहेत. त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला असता ईडीने शुक्रवारी तीव्र विरोध दर्शविला आहे. ईडीने न्यायालयात सविस्तरपणे आपले उत्तर मांडले आहे त्यात पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात संजय राऊत यांचा थेट सहभाग आहे. ते जर बाहेर आले तर साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. त्यामुळे संजय राऊत यांना जामीन देऊ नये असे ईडीने स्पष्ट म्हटले आहे. आता जामीन अर्जावर पुढील सुनावणी १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. पण ईडीची भूमिका पाहता संजय राऊत यांना जामीन मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.