दसरा मेळावा: १८०० लालपरी बूक, ३ हजार खासगी गाड्याही आरक्षित, १० कोटी रोख भरले, शिंदेंची ‘पॉवर’

राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं आहे मुंबत होणाऱ्या दोन दसरा मेळाव्याकडे, यंदाचा दसरा मेळावा त्याची नोंद राज्याच्या इतिहासात होणार यात शंकाच नाही. दोन्ही गट दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहेत. कार्यकर्ते बस, वाहने, एसटी यातून मोठ्या संख्येने कसे येतील याकडे दोन्ही गट लक्ष ठेवून आहेत.शिवसेनेच्या दोन गटांच्या स्वतंत्र सभा होणार असल्याने गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जातो आहे. शिंदे गटाने लोकांना मेळाव्याला आणण्यासाठी तब्बल १८०० एसटी बसेसचं बुकिंग केल्याची माहिती समोर आलेली आहे. यासाठी तब्बल १० कोटी रुपये रोख भरले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे.

सोमवारी सायंकाळी ५ पर्यंत १८०० एसटी गाड्यांचे आरक्षण शिंदे यांच्या गटाने केले होते. तीन हजार खासगी गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण झालेले आहे. बीकेसी परिसरात सभेसाठी लाख-दीड लाख लोकांची गर्दी अपेक्षित आहे. ही गर्दी जमविण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी गेली १५ दिवस जिल्हा पिंजून काढलेला आहे. प्रत्येक शिवसैनिकाची मुंबईत येण्यापासून राहण्या-खाण्यापर्यंतची व्यवस्था अगदी चोख करण्यात आलेली आहे.

लालपरीचं बुकिंग करण्यासाठी शिंदे गटाने तब्बल १० कोटी रुपये खर्च केले आहेत. ही रक्कम मोजण्यासाठी दोन दिवस लागले अशी माहिती सुत्रांनी दिलेली आहे.शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला गाड्यांचं आरक्षण होत होतं पण इतिहासात पहिल्यांदाच महामंडळाच्या गाड्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणात आरक्षण झालेलं आहे असेएसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने १४०० खासगी बस आरक्षित केलेल्या आहेत. शिवसेनेच्या शाखाप्रमुख, नगरसेवक यांना स्वखर्चाने कार्यकर्ते सभास्थळी येण्याच्या सूचना आहेत. कसारा, कर्जत, खोपोली, पालघर, विरार, डहाणू रोड येथून येणाऱ्या मिनी बस, टेम्पो ट्रॅव्हलर, सात आसनी कार अशा वाहनांची संख्यादेखील हजारोंच्या संख्येत असणार आहे. दोन्ही सभांसाठी साधारण दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे असे राज्यातील खासगी बसचालक-मालकांकडून सांगण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.