एकनाथ शिंदेंचं सॉल्लिड प्लॅनिंग; निवडणूक आयोगातील लढाईसाठी BKC मैदानावरच खोऱ्याने ‘पुरावे’ जमवणार

शिवसेनेतील फुटीनंतर होणारा दसरा मेळावा याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्यामुळे यावेळचा त्यांचा मेळावाही ऐतिहासिक ठरणार आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यातील खास गोष्ट म्हणजे व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची खुर्ची राखीव ठेवण्यात आलेली आहे.
उद्धव ठाकरेंसोबत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपले सरकार म्हणजे बाळसाहेबांच्या विचाराचे सरकार असल्याचे सांगितले होते. आज देखील मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची खुर्ची राखीव ठेवत आम्हीच बाळासाहेबांचे शिवसैनिक अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जाणारा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम आपल्या भाषणात हे बाळासाहेबांचे हिंदूत्व आणि दिघे साहेबांची शिकवणीनुसार चालणरे सरकार आहे असे म्हणत असतात. खरी शिवसेना आमचीच आहे असे दाखवण्यासाठी शिंदे गटाने हा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.
या मेळाव्यासाठी तब्बल ३ लाखांची गर्दी BKC मैदानावर जमेल, असा अंदाज आहे. या संधीचा फायदा शिंदे गटाकडून घेण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या कोर्टातील लढाईसाठी खोऱ्याने पुरावे जमवण्याची योजना आखलेली आहे अशी माहिती हाती आलेली आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून सदस्य नोंदणीचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. BKC मैदान परिसरात येताच हे अर्ज कार्यकर्त्यांच्या हातात ठेवले जातील. त्यामुळे आज एकाच दिवसात शिंदे गटाच्या शिवसेनेत लाखोंच्या संख्येने सदस्य नोंदणी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हेच अर्ज निवडणूक आयोगापुढे सादर करुन शिंदे गट आम्हीच खरी शिवसेना हा दावा अधिकच बळकट करेल यात शंकाच नाही.
तर दुसरीकडे नेस्कोप्रमाणे शिवाजी पार्कवरील ठाकरेंच्या मेळाव्यात संजय राऊतांची खुर्ची ठेवण्यात आली आहे. शिवसेना संजय राऊत यांच्या पाठिशी ठाम असल्याचा संदेश यामागे देण्यात आलाय. दरम्यान शिंदे यांच्या कडव्या आव्हानासमोर यावर्षी शिवाजी पार्कवरचा मेळावा ऐतिहासिक करण्याचं मोठं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आहे. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे टीकेचे कोणते बाण सोडणार आणि शिवसेनेला कोणती नवी दिशा दाखवणार याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे.