मंत्रिमंडळ विस्ताराआधी दिल्लीत खलबतं !

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील ही पहिली औपचारिक भेट होणार आहे. उद्या शुक्रवारी (8 जुलै) ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यात ही भेट होणार आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यातील पहिल्या टप्प्याचा विस्तार हा आषाढी एकादशीच्या आधी होणार आहे. याचाच अर्थ येत्या 10 जुलैच्या आधी शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्प्याच्या विस्तारातील 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर समृद्धी महामार्गाचे उदघाटन आम्ही करू, अशी घोषणा फडणवीस यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केली होती. तत्पूर्वीच, आता मोदी-शिंदेंची पहिली औपचारीक भेट होत आहे.