भाजप शिंदे गटाला बळ देणार? ‘या’ खासदाराचे नाव चर्चेत !

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना भाजपने साथ दिली आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता आली. आता भाजप केंद्रातसुद्धा शिंदे गटाला बळ देणार अशी चर्चा आहे. भाजपकडून शिंदे यांच्या समर्थक खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शिंदे समर्थक खासदाराला हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिपद दिलं जाईल असेही बोलले जाते आहे. यात बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे समर्थक खासदाराला साथ देवून भाजप शिंदे गटाला बळ तर देतेच आहे. शिवाय यामुळे उद्धव ठाकरेंसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय अशी चर्चा आहे.
२०१९ मध्ये शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. आपल्याला आठवत असेल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. महाराष्ट्रात आता भाजप सत्तेत आहे. भाजपला महाराष्ट्रात शिंदे गटामुळे सरकार स्थापन करता आलं. त्यामुळे शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात हिवाळी अधिवेशनापूर्वी स्थान मिळू शकते. शिवसेनेतील १८ खासदारांपैकी १२ खासदारांनी शिंदे गटाला साथ दिलेली आहे. आता या १२ खासदारांपैकी काही जणांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रीपदाची माळ नक्कीच पडणार आहे.
शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. या १२ खासदारांपैकी काहींना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या खासदारांपैकी काही जणांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट, राज्यमंत्रिपद किंवा राष्ट्रीय पातळीवरील एखाद्या समितीचं अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.