शिंदे पुन्हा सुप्रीम कोर्टात ! शिवसेना मिळविण्यासाठी शिंदे गटाची घाई ?

शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा पुन्हा ठोठावला आहे. याला कारण आहे येत्या काळात येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका आणि निवडणुक म्हटली की चिन्ह हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे शिंदे गटाला आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय लवकरात लवकर लागावा असे वाटतेय. शिंदे गटाने यासंदर्भात सुप्रीम कोर्टात रीट याचिका दाखल केलीय. सुप्रीम कोर्टानं तात्काळ सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिंदे गटाने केलीय. शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होत आहे. मात्र कोर्टाच्या निर्णयाआधीच शिवसेना पक्षाविषयीचा निर्णय लागणे महत्त्वाचं असल्याचं शिंदे गटानं म्हटलंय..
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनवाणीला स्थगिती देऊ नये, यासाठी एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आगामी काही निवडणुकांच्या आदी शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि इतर तांत्रिक बाबींचा निकाल लागणे फारच महत्त्वाचे आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं तत्काळ सुनावणी घ्यावी अशी विनंती शिंदे गटाकडून करण्यात आलीय.
सुप्रीम कोर्टासमोर सुनावणी झाल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवसेनेविषयीची सुनावणी घेता येणार नाही. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेला पक्षावरील दावा मजबूत करण्यासाठी आणखी काही कागदपत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे द्यावी लागणार आहेत. ही कागदपत्रे सुपूर्द करण्यासाठी आयोगाने शिवसेनेला चार आठवड्यांची मुदतवाढ दिलीय.ही मुदत येत्या 23 सप्टेंबरपर्यंत असेल. ठाकरे गटाच्या विनंतीनंतरच सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती दिलेली आहे.