शिंदे कोणत्या अधिकाराने निवडणूक आयोगाकडे गेले? घटनापीठाचा सवाल; सिब्बलांचाही जोरदार युक्तीवाद

सुप्रीम कोर्टात राज्याच्या सत्तासंघर्षावर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा २० जूनपासून महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. त्यामुळे प्रथम आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय झाला पाहिजे असा आग्रह कपिल सिब्बल यांनी धरला. यावेळी घटनापीठाने एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकाराने शिवसेनेचे चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे गेले, असा सवाल उपस्थित केला. ते शिवसेनेचे सदस्य म्हणून की आमदार म्हणून निवडणूक आयोगाकडे गेले होते, असा सवाल घटनापीठाने विचारला. यावर कपिल सिब्बल यांनी म्हटले की, हाच मूळ मुद्दा आहे. प्रथम एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकारात निवडणूक आयोगाकडे गेले होते, हे स्पष्ट झाले पाहिजे. त्यावर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सदस्य असल्यास निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात, असे घटनापीठाने म्हटले आहे.
Sibal: Now he wants to go to the ECI and say that I am the political party. But much before that his membership to the party is in question in these proceedings, which have to be decided first.
— Live Law (@LiveLawIndia) September 27, 2022
व्हीप धुडकावणाऱ्यांवर राजकीय पक्षाला कारवाईचे अधिकार, ते संबंधित पक्षाचे असतात. निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाने मूळ पक्ष असल्याचा दावा केला आहे. मात्र पक्षाचं सदस्यत्व आहे की, नाही; हे ठरवणं महत्त्वाचे आहे, असा युक्तिवादही कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या चिन्हाबाबत याचिका दाखल केल्यानंतरच आताचा पेच निर्माण झाल्याचे घटनापीठाने म्हटले. यावर सिब्बल यांनी पु्न्हा पक्षांतरबंदीचा मुद्दा उपस्थित केला. दहाव्या परिशिष्टानुसार पक्षातील फुटीला मान्यत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.