संतोष बांगर शिंदे गटात कसे आले? 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. बांगर यांच्या बंडखोरीनंतर आता शिंदे गटाकडे एकूण ४० आमदार झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार गुवाहाटी येथे मुक्कामी गेल्यानंतर संतोष बांगर यांनी या सर्व आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन करताना त्यांना अश्रूदेखील अनावर झाले होते. मात्र हेच बांगर आता शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, बांगर यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. याबद्दल आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी संतोष बांगर शिंदे गटात कसे आले? याबद्दल विधिमंडळात माहिती दिली आहे.

“संतोष बांगर यांना मी बोलवलं नाही. त्यांनी मला फोन केला होता. मला कसं बोलावं म्हणून ते घाबरत होते. पण त्यांनी रात्री दीड वाजता फोन केला. मला यायचं आहे, माझी चूक झाली आहे. आणखी तीन ते चार लोक आहेत, त्यांचही मत असंच आहे, असं बांगर यांनी मला सांगितलं. नंतर मी बांगर यांना सांगितलं की, आपल्याला खोटं काहीही करायचं नाही,” असे एकनाथ शिंदे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले.

तसेच, “आम्ही गुवाहाटीमध्ये होतो, तेव्हा ते म्हणत होते; की आमच्या संपर्कात दहा आमदार आहेत., पंधरा आमदार आहेत. मी म्हणालो नावं तर सांगा. आमदार नितीन देशमुख यांना परत पाठवलं. त्यांच्यासोबत दोन कार्यकर्ते दिले होते. स्पेशल विमानाने त्यांना परत पाठवलं. मी कोणावर जबरदस्ती कसा करु शकेन? कोणाला बंदूक लावून आणलं का? ते सगळे स्वत:च्या मर्जीने आले,” अशी माहिती शिंदे यांनी दिली.

तसेच पुढे बोलताना, “अडीच वर्षापूर्वी केलेली चूक आता दुरुस्त करुयात, या विचाराने ते परत आले. आम्ही ५० लोक आणि भाजपाचे ११५ आहेत. भाजपा हा पक्ष सत्तेसाठी काहीही करेन, असं म्हटलं जात होतं. मात्र या सर्व घटनाक्रमामध्ये एकही व्यक्ती तुरुंगात गेला नाही. कारण त्यांना ते करायचं नव्हतं. त्यांना लाढाई प्रेमाने जिंकायची होती,” असेदेखील एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.