एलॉन मस्क यांचा ट्विटरला दे धक्का !

टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी शुक्रवारी ट्विटर विकत घेण्यासाठीचा ४४ अब्ज डॉलर्सचा करार रद्द केला आहे. ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी फेक अकाउंटची माहिती देण्यात अपयशी ठरल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या करारातून माघार घेतल्यानंतर ट्विटर आता एलॉन मस्क यांच्यावर खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे.
एलॉन मस्क यांच्या वकिलांनी सांगितले की, ट्विटर अनेक विनंत्या करूनही बनावट किंवा स्पॅम खात्यांबद्दल माहिती देण्यात अयशस्वी झाले. “मस्क हा करार रद्द करत आहेत. ट्विटरने त्यांच्यासोबत केलेल्या कराराचा भंग केल्यामुळे ते असे करत आहेत. ट्विटरने एलॉन मस्क यांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. हा करार त्यावरच अवलंबून होता,” असे मस्क यांच्या वकिलांनी सांगितले.
“ट्विटरने त्या करारातील अनेक तरतुदींचे भौतिक उल्लंघन केले आहे. त्याने खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे असे दिसते ज्यामुळे इलॉन मस्क यांना करार रद्द करण्यास प्रवृत्त केले,” असे एलॉन मस्क यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
ट्विटर कायदेशीर कारवाईही करणार
यानंतर, आता ट्विटरकडून असे सांगण्यात आले आहे की कंपनीला हे विलीनीकरण पूर्ण करायचे आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी केली जात आहे. कराराची अंमलबजावणी करण्यासाठी ट्विटर बोर्ड कायदेशीर कारवाई करण्याची योजना आखत असल्याचे ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टायलो यांनी म्हटले आहे.ब्रेट टेलर यांच्या या ट्विटला उत्तर देताना काही ट्विटर भागधारकांनी, इलॉन मस्क यांनी दंड भरावा आणि त्याने या करारामधून बाहेर पडावे असे त्यांनी म्हटले आहे. कारण त्यांना एलॉन मस्क यांना ट्विटरचे मालक म्हणून बघायचे नाही.
दरम्यान, एप्रिलमध्ये एलॉन मस्क आणि ट्विटरमध्ये ५४.२० डॉलर प्रति शेअर दराने सुमारे ४४ बिलियन डॉलरचा करार झाला होता. मात्र, त्यानंतर मे महिन्यात मस्क यांनी या करार थांबवला होता. मस्क म्हणाले होते की ट्विटरने प्रथम हे सिद्ध केले पाहिजे की प्लॅटफॉर्मवरील बॉट्स खाती पाच टक्क्यांपेक्षा कमी आहेत. काही दिवसांपूर्वी, ट्विटरने सांगितले की पहिल्या तिमाहीत, दैनिक सक्रिय वापरकर्त्यांमधील बनावट किंवा स्पॅम खात्यांची संख्या पाच टक्क्यांपेक्षा कमी होती. ट्विटरशी झालेल्या करारानंतर इलॉन मस्क यांनी या प्लॅटफॉर्मवरून ‘स्पॅम बॉट्स’ पूर्णपणे काढून टाकण्याविषयी सांगितले होते.