उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंविरोधात मोठी खेळी !

शिवसेनेते सध्या दोन गट तयार झाले असून ठाकरे आणि शिंदे गट दोन्ही म्हणतायेत शिवसेना आमची आहे. दरम्यान आता राज्यात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगणार आहे यात शंकाच नाही. यासाठी पहिलं पाऊल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेले आहे. अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी उमेदवाराची घोषणा केली आहे. अंधेरी पूर्वमधून शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झालं होतं, त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली आहे.
रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी आज (६ सप्टेंबर) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.अंधेरी पूर्वची ही पोटनिवडणूक कधी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे, कारण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचा हा पहिलाच सामना आहे. तसंच या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेना कोणाची तसेच धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार हे दोन्ही वाद सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत. समजा अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होईपर्यंत जर या दोन्ही प्रकरणांचा निकाल लागला नाही, तर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं, अशा परिस्थितीमध्ये शिंदे आणि ठाकरे यांना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते.