कालीमातेच्या पोस्टर प्रकरणात शिवसेनेची उडी !

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मंगळवारी काली या महितीपटाच्या पोस्टरवरुन नाराजी व्यक्त केलीय. या पोस्टरमध्ये कालीमातेच्या हाती सिगारेट दाखवण्यात आल्यावरुन मोठा वाद निर्माण झाला असून या वादात आता शिवसेनेनं उडी घेतली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ हिंदू देवतांपुरतेच राखीव ठेवता येणार नाही, असा टोला चतुर्वेदी यांनी लगावलाय.
चतुर्वेदी यांनी ट्विटरवरुन या प्रकरणावर भाष्य केलं आहे. इतरांच्या धार्मिक भावनांची चिंता करायची आणि दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ हिंदू देवी-देवतांबद्दलच वापरायचं असं होऊ शकत नाही, अशा अर्थाचं ट्विट त्यांनी केलंय. या पोस्टवरील कालीमातेचा फोटो पाहून माझ्या भावना दुखावल्या आहेत. मान हा सर्वांना समान पद्धतीने दिला गेला पाहिजे, अशी अपेक्षाही चतुर्वेदी यांनी व्यक्त केलीय.
लिना यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या काली या माहितीपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा नावाच्या कार्यक्रमादरम्यान अगा खान संग्रहालयामध्ये हे पोस्टर लॉन्च करण्यात आलं. मात्र या प्रकरणावरुन कॅनडा सरकारकडे भारताने आक्षेप नोंदवल्यानंतर यासंदर्भात दिलगीरी व्यक्त करण्यात आलीय.