धनुष्यबाण चिन्ह गोठवा, शिंदे गटाची मागणी ! सुप्रीम कोर्टात काय घडले?

राज्यातील सत्ता संघर्षावर सुरु असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत मोठी बातमी समोर आलीय. सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर होणारी सुनावणी आता 27 सप्टेंबरला होणार आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ स्थापन करण्यात आलंय.
घटनापीठासमोर आज पहिल्यांदाच सुनावणी झाली. पाच मिनिटात ही सुनावणी संपली. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी धनुष्यबाण हे चिन्हं गोठवा अशी मागणी केलीय. शिंदे गटाकडून पहिल्यांदाच ही मागणी करण्यात आलीय. निवडणुका लक्षात घेता यावर लवकर निर्णय घ्या, असा आग्रह शिंदे गटाकडून धरण्यात आला. त्यावर शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्पष्टता येणं गरजेचं असल्याचं शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत.
धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केल्यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत शिवसेना आमचीच, धनुष्यबाण आमचाच असा दावा शिंदे गटाकडून वारंवार करण्यात येतोय.परंतु पहिल्यांदाच घटनापीठाकडे सुनावणी घेताना शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवा अशी मागणी केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घ्या अशी मागणी शिंदे गटाचे वकील कौल यांनी केली.