राजघाट नाहीतर निगमबोध घाटावर भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्य संस्कार करण्यात आल्याने अंत्य संस्कारां वेळी भाजप सरकारकडून त्यांचा अपमान करण्यात आला असे आरोप होत असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांना राजघाट का नाकारण्यात आला असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. म्हणूनच भाजप सरकारने खरंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान केला का? सरकारच्या कोणत्या कृत्यांमुळे त्यांचा अपमान झाला? आणि यावर भाजपा व काँग्रेसने नेमकी कोणती भूमीका घेतली आहे तेच जाणून घेऊयात
अर्थतज्ज्ञ व २००४ ते २०१४ पर्यंत भारताचे पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी २६ डिसेंबर २०२४ रोजी उशिरा रात्री दिल्लीतील एम्स येथे निधन झाले होते. २८ डिसेंबरला निगमबोध घाटावर पूर्ण सन्मानाने, शासकीय इतमामात त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अंत्यसंस्काराच्या जागेची निवड हि डॉ. मनमोहन सिंग यांचा “अपमान” आहे असं म्हटलंय.
“भारतमातेचे महान सुपुत्र आणि शीख समुदायाचे पहिले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून सध्याच्या सरकारने त्यांचा पूर्णपणे अपमान केला आहे. ते एक दशक भारताचे पंतप्रधान होते, त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक महासत्ता बनला आणि त्यांची धोरणे अजूनही देशातील गरीब आणि मागासवर्गीयांना आधार देतात, आजपर्यंत, सर्व माजी पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर करून, त्यांचे अंत्यसंस्कार राजघाट येथे करण्यात आले जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला अंतिम ‘दर्शन’ घेता येईल आणि कोणत्याही गैरसोयीशिवाय श्रद्धांजली वाहता येईल. डॉ. मनमोहन सिंग हे आपल्या सर्वोच्च आदराचे आणि स्मारकाचे पात्र आहेत. सरकारने देशाच्या या महान सुपुत्राचा आणि त्यांच्या अभिमानी समुदायाचा आदर करायला हवा होता,” असं राहुल गांधी या प्रकाराबाबत बोलताना म्हणाले.
डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान होते. त्याप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील राजघाट येथे होण व त्यासोबतच राजघाट येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभारणं अपेक्षित होत, मात्र असं काहीही झालं नाही. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार राजघाट ऐवजी निगमबोध घाटावर करण्यात आले. तर त्यांच्या स्मारकासाठी कोणतीही जागा तातडीने उपलब्ध करून न देता, दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी योग्य जागा शोधण्यात येईल व तेथे त्यांचे स्मारक उभारले जाईल असं सरकारने म्हटले आहे. यासोबतच मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारांचे थेट प्रक्षेपण देखील कोणत्याही शासकीय वाहिनी कडून करण्यात आले नव्हते. परिणामी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांना या प्रकारची दुय्यम वागणूक देऊन सरकार ने डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान केला आहे असा आरोप अनेक जण करत असून, या मुद्द्यावरून अनेकांनी सरकारवर टीका देखील केली आहे.
या सगळ्या आरोपांनंतर भाजपची बाजू मांडताना गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. “भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचे अंत्यसंस्कार दिल्लीत का झाले नाहीत? त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ शहरात करण्यास कोणी सांगितले होते. काँग्रेसने नरसिंहराव यांच्यासाठी नेमके कुठे स्मारक बांधले आहे? त्या स्मारकाचा पत्ता कृपा करून आम्हाला द्यावा. आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र तिथे जाऊ” असं म्हणत काँग्रेसच्या काळात पी व्ही नरसिंहराव यांच्यावर झालेल्या अन्यायाचा दाखला देत डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिलेल्या वागणुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न गौरव भाटिया यांनी केला आहे.
जवळपास एक दशक भारताचे पंतप्रधान राहिलेले, व शीख समुदायाचे एकमेव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मिळालेली एकूणच हि वागणूक अतिशय खेद जनक असून यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान झाला का? यावर तुमचे मत काय ते कंमेंट करून नक्की सांगा.
भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना महाराष्ट्र कट्ट्याच्या संपूर्ण टीम कडून भावपूर्ण श्राद्धांजली.