शिंदे गटाच्या खासदारांची काय आहे मागणी?

शिवसेनेतून वेगळी चूल मांडणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्रीच दिल्लीत गेले आहेत. तेथे त्यांनी आज शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतली. काल कार्यकारिणी ठरवताना या खासदारांची ऑनलाईन हजेरी होती. लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली.
काय केली मागणी?
शिवसेना खासदार लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या वेगळ्या गटाचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. आधी विनायक राऊत गटनेतेपदी होते. आता राहुल शेवाळेंना त्यावर निवडण्यात आलं आहे. त्यांची नियुक्ती करण्यात यावी. आधीच्या पक्षकार्यालयापेक्षा नव्या कार्यालयाची मागणीही या पत्राद्वारे केल्याचं शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं आहे.
‘या’ खासदारांचा समावेश
श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, हेमंत पाटील, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, प्रताप जाधव, भावना गवळी, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
आमचीच मूळ शिवसेना
बंडखोर खासदारांना भेटून मुख्यमंत्री शिंदे आम्ही मूळ पक्ष शिवसेना असल्याचं सांगतील आणि या खासदारांना पुन्हा रालोआमध्ये समाविष्ट केलं जाईल, असं बोललं जात आहे. आमदारांबद्दलही त्यांनी हाच निर्णय घेतला होता. लोकसभेत प्रतोदपदी राजन विचारे तर गटनेते म्हणून विनायक राऊत आहेत. आता त्यांच्या जागी राहुल शेवाळेंची गटनेतेपदी, तर भावना गवळी यांची प्रतोदपदी नियुक्ती केली जाणार आहे. त्याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देण्यात आले आहे. खासदारांनीही साथ सोडल्यामुळे आता ठाकरे गटाला कोर्टात जाणे हाच पर्याय उपलब्ध आहे.