महिलांचा गराडा, ठाकरे गरजले, ‘सोनं जळलं की…’

उद्धव ठाकरे गटाला नवं चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर त्याचा जोरदार प्रचार शिवसैनिक करत आहेत. विशेष करुन शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या बालेकिल्ल्यात सभा घेवून ठाकरेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जातंय. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ठाणे ‘ या बालेकिल्यात उद्धव शिवसेनेच्या महिला आघाडीने हाती पेटती मशाल घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर या शेकडो महिला मातोश्री येथे आल्या. त्यांनी उद्धव ठाकरे यांना महिला शिवसैनिक आरपारच्या लढाईला तयार असल्याचा विश्वास दिला. तेव्हा उद्धव ठाकरेंनी महिला शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. आपली शिवसेनाच खरी आहे, सोनं जळतं त्यावेळी उजळून निघते आणि बाकीच्यांच पितळं उघडं पडेल तो भाग वेगळा आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील महिला शिवसैनिकांशी संवाद साधताना, शिवसेना हे बावनकशी सोनं असून ते ज्यावेळी जळत तेव्हा उजळून निघत असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक यांची देखील आठवण सांगितली. वामनराव महाडिककिती लढवय्या होते त्याच प्रमाणे आपल्याला लढायचे आहे असे ठाकरे म्हणाले. दरम्यान शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रा ९ ऑक्टोबरला ठाण्यापासून सुरु झाली असून त्याता समारोप कोल्हापूरच्या बिंदू चौकात होणार आहे.