महाराष्ट्रात पुन्हा घातपाताचा प्रयत्न?

सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रायगडमधील श्रीवर्धन हरिहरेश्वर समुद्रकिनारी २ निनावी बोट आढळल्या असून त्यात तीन एके-४७ आढळल्या आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी २ संशयास्पद बोटी आढळलेल्या आहेत. या बोटीत ३ एके ४७ आणि २२५ राऊंड्स, कॉन्फरन्स टेबल, कॅम्प्युटर आढळलेले आहेत. नेपच्युन सिक्युरिटी मेरेटाइन असं बोटीवर लोगो आहे. पोलीस तपास करत आहेत. दरम्यान या बोटी बेवासर स्थितीत होत्या. तेव्हा काही ग्रामस्थांनी बोट काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यात एके-४७ बंदुका आढळून आल्या. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत संशयास्पद वस्तू ताब्यात घेतलेल्या आहेत.
दरम्यान विधान परिषदेत आमदार अनिल तटकरे यांनी मुद्दा उपस्थित केला आहे. रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी एके ४७, काडतूस सापडणे हा राज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. गोकुळाष्टमी, गणेशोत्सव हे सण येत आहेत. पुन्हा २६/११ ची पुनरावृत्ती होतेय का? अशी भीती वाटते आहे. राज्यात दहशतवादी घुसलेत का? याबाबत सरकारने निवेदन सादर करावे अशी मागणी त्यांनी सभागृहात केलेली आहे. तर विधानसभेत आमदार आदिती तटकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.सरकारने त्वरीत टीम नेमून स्थानिक आणि राज्यातील लोकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात असं आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान या बोटीवर संशयित कागदपत्रे सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. एटीएस प्रमुख विनित अग्रवालसह त्यांचे पथक रायगडकडे रवाना झाले आहेत. प्राथमिक चौकशीत त्या बोटीचं ओमन कनेक्शन उघड झालं आहे. ती बोट युकेमध्ये रजिस्टर्ड असून तेथील एका कंपनीची ती बोट आहे.दोन व्यक्तींबाबत पोलिसांना कळले असून ते दोघे इंडोनेशिआ येथील आहेत. एका ऑस्ट्रेलियन नागरीकाचे कागदपत्र सापडले आहेत त्याबद्दल तपास सुरु आहे. ही बोट ओमन येथे रेस्क्यू करण्यात आली होती. ती ओमनमध्ये ठेवण्यात आली होती पण खवळलेल्या अरबी सुमद्रातून वाहत ती रायगड येथे पोहोचली, पोलीस या प्रकरणाक अधिक तपास करत आहेत.