पुढचे ३ दिवस मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा !

पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुण्यासह १८ जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागातर्फे हा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात जुलै महिन्यात पाऊस जोरदार बरसला असून काही जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती पहायला मिळाली. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला होता मात्र आता पुढचे तीन पाऊस जोर पकडेल म्हणून हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रातील पश्चिमेकडील प्रवाह अंशतः मजबूत झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती पुणे आयएमडी, हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. तसेच २८ जुलैनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.