नवा विरोधी पक्षनेता कोण असणार?

गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचा कारभार सांभाळणारे ठाकरे सरकार आता कोसळले आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रात भाजपकडून सत्तास्थापन केली जाईल. विरोधी पक्षनेता म्हणून ठाकरे सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतील, हे जवळपास निश्चित आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून किती प्रभावीपणे काम करता येऊ शकते, याचा उत्तम वस्तूपाठ घालून दिला आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे कधी नव्हे इतके विरोधी पक्षनेत्याभोवती केंद्रित राहिले होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या जाण्यानंतर महाराष्ट्राचा पुढचा विरोधी पक्षनेता कोण असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
शिवसेनेवर विरोधी पक्षनेतेपद गमावण्याची नामुष्की
यापूर्वीच्या संख्याबळाच्या समीकरणांनुसार शिवसेना हा महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष होता. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेकडे अवघे १६ आमदार उरले आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्रीपद असलेल्या शिवसेनेवर आता विरोधी पक्षनेतेपद गमावण्याची नामुष्की ओढावली आहे. महाविकास आघाडीत आता ५३ आमदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेतेपद आता राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल, यात काही शंकाच नाही.
ठाकरे सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. त्यामुळे आता विरोधी पक्षात गेल्यानंतरही राष्ट्रवादीचे विधिमंडळातील सर्वोच्च पद हे अजित पवारांकडेच राहील, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद गेले तरी अजित पवार यांचे वैयक्तिकरित्या फारसे नुकसान होणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विरोधी पक्षनेता हा म्हणजे एकप्रकारे ‘शॅडो मुख्यमंत्री’ असतो, असे राजकारणात सर्रास म्हटले जाते. या पदाची ताकद आणि प्रभाव काय असू शकतो, हे देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये दाखवूनच दिले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळणे, ही त्यांच्यासाठी आणखी एक मोठी संधी असू शकते. अजित पवारांनी हे पद न स्वीकारल्या ही जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे जाऊ शकते. जयंत पाटील यांनाही सभागृहातील राजकारणाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मात्र, हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस यांच्याइतकी प्रभावी कामगिरी करु शकतात का, हेदेखील पाहावे लागेल.