मुलांना मेडिटेशन कसे शिकवावे?

घडाळ्याच्या काट्यावर आपलं जीवन सुरु आहे.सकाळपासून रात्री झोपेपर्यंत माणूस पळत असतो पळत असतो. मोठी मंडळी काय किंवा लहान मुलं काय सध्याची लाईफस्टाईल पाहता दिवसाचे २४ तास सुद्धा कमी पडतील असे वाटते. मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलांनासुद्धा ताणतणाव होत असतात. शाळा, क्लासचा अभ्यास शिवाय अनेक ऍक्टिव्हीटी यामुळे तुम्ही पाहिलं असेल काही मुलं घरी आल्यावर खूप चिडचिड करतात. आता विचार करा ज्या घरात आई-बाबा नोकरी करतायेत आणि मुलं सुद्धा त्रासून घरी आल्यावर राग राग करत असतील तर त्या घराचं रणांगण व्हायला वेळ लागणार नाही.
चिडचिड करणाऱ्या लहान मुलांचा राग कमी कसा करायचा? हा प्रश्न प्रत्येक आई-वडिलांना पडलेला असतो. यासाठी तुम्ही मेडिटेशनची मदत घेवू शकता. आता तुम्ही म्हणाल, लहान मुलांना मेडिटेशन कसं शिकवायचं? हा तर खूप मोठा टास्क आहे. पण खरं सांगू का, लहान मुलं अतिशय निरागस असतात. आपल्या डोक्यात जसे भारंभार विचार चालतात तसे विचार या मुलांच्या मनात येत नाहीत त्यामुळे लहान मुले मेडिटेशन अर्थात ध्यानधारणा पटकन शिकतात.
तुम्हाला माहित असेल मुलं आई-वडिलांचं अनुकरण पटकन करतात जर तुम्ही स्वतः मेडिटेशन करत असाल तर तुमची मुलंसुद्धा मेडिटेशन पटकन शिकतील. आता प्रश्न येतो मेडिटेशन मुलांना कसं शिकवायचं? मुलांना मेडिटेशन शिकवताना एक व्यक्ती म्हणजे आई किंवा बाब त्याच्याबरोबर असणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यानंतर मुलासोबत वॉकला जा. समजा कॉलनीत गार्डन असले तर त्याला फेरी मारा. तुम्हाला जम्पिंगच्या एक्सरसाईज करता आल्या तर त्या करा. यामुळे काय होतं शुद्ध हवा तुमच्या फुफ्फुसात जाते. श्वास घेण्याचा स्पिड वाढतो आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.
आता शांत जागा शोधा. तिथे तुम्ही आणि तुमची मुलं शांतपणे बसा. तुमचा श्वास सेटल डाऊन करा. मुलाला दीर्घ श्वास घ्यायला सांगा आणि हळूहळू तो नाकावाटे सोडायला सांगा असे तीन ते चारवेळा करा. आपल्याला खूप शांत वाटेल. आता आपल्याला श्वासावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. डोळे बंद करून शांतपणे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रीत करा. तुझ्या शरीरात हा जो श्वास जात आहे त्यावर लक्ष केंद्रीत कर आणि तो कुठपर्यंत जातो आहे ते जाणून घे. मुलं ही गोष्ट मन लावून करतात फक्त त्यांच्या सोबत राहा आणि त्यांना प्रोत्साहन द्या.
एकदा मुलांचं श्वासावर लक्ष केंद्रीत झालं की अगदी शांत संगीत तिथे लावा. मुलं ते संगीत ऐकतात पण त्याचबरोबर श्वासाकडेही त्यांचे लक्ष असतं. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. सध्याच्या काळात मुलांमध्ये डिप्रेशन वाढतंय पण जर मेडिटेशनची मदत घेतली डिप्रेशनमधून आपण मुलांना बाहेर काढू शकतो. तेव्हा मुलांच्या विकासासोबत सकारात्मक व्यक्तीमत्व घडविण्यासाठी मुलांना मेडिटेशन शिकवणे खूप गरजेचे आहे.