फडणवीसांसाठी ब्राह्मण महासंघाचं नड्डांना पत्र, मोदींचा उल्लेख करत केली मोठी मागणी, म्हणाले “मोदींनंतर भाजपात…”

महाराष्ट्रामधील भाजपचे डॅशिंग नेते कोण असा प्रश्न विचारला तर लगेच डोळ्यासमोर येतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्याच्या राजकारणात फडणवीस यांची नेहमीच चर्चा असते आणि कालपासून या चर्चेत भर पडली आहे कारण भाजपाच्या संसदीय मंडळावर आणि केंद्रीय निवडणूक समितीमध्ये गडकरी यांना वगळून फडणवीस यांना स्थान दिलेले आहे. राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु आहे. आता फडणवीसांसाठी राष्ट्रीय राजकारणाचे दरवाजे खुले झाले आहेत दरम्यान या सगळ्यात आता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने उडी घेतली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र लिहीले आहे त्यात देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे. फडणवीस राष्ट्रीय राजकारणात देखील आपली घोडदौड कायम ठेवतील असा विश्वास ब्राम्हण महासंघाने व्यक्त केला आहे.भाजप नक्कीच फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेसाठी उमेदवारी देईल अशी आशा व्यक्त करण्यात आलेली आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र लिहीले आहे. त्यात असे म्हटले आहे, संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांना आपण स्थान दिलंत त्याबद्दल अभिनंदन. देवेंद्र फडणवीस हे एक कुशल राजकारणी आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात हे सिद्ध केलेले आहे. ते भाजपाचे भविष्य आहेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाला सक्षम नेतृत्व देणाऱ्यांमध्ये जी काही दोन-तीन नावे आहेत, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक महिन्यापूर्वी त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले होते त्याचा त्यांना धक्का नक्कीच बसला होता. पण आता या निर्णयाने फडणवीस यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. या निवडीसोबत राष्ट्रीय कार्यामध्ये फडणवीसांच्या कामाला सुरुवात झाली आहे असं मानलं जाऊ शकतं. पुण्यातील ब्राह्मण महासंघ २००९ मध्ये काँग्रेसच्या सुरेश कलमाडींसोबत उभा होता. २०१४ मध्ये अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीष बापट यांना पाठिंबा दिला होता. त्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. त्यामुळे फडणवीसांसारख्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी ही सुरक्षित जागा आहे. फडणवीसांना फक्त अर्ज भरायचा आहे, जिंकवण्याचं काम ब्राह्मण महासंघ करणार,” असा शब्दही त्यांनी दिला आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. तरीही राष्ट्रहितासाठी आमचा आग्रह आहे,” असं त्यांनी पत्रात सांगितलं आहे.