‘उद्धव ठाकरेंना भेटणार का?’ मुख्यमंत्री काय म्हणाले?

अनेक राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर स्थानापन्न झाले आहेत. यंदाचा महापूजेचा मान कुणाला मिळणार, यावर अनेक चर्चा रंगत होत्या. अखेर तो मान नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच प्राप्त झाला. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली.
महापुजेनंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितले कि, ते लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेशी बंड केल्यापासून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना भेटलेले नाहीत. त्यामुळे या भेटीत ते नेमके काय बोलणार आणि काय ठरणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. शिवसेनेने शिंदे गटाला गद्दार म्हणून हिणवले आहे तर काल (९ जुलै) दिल्ली येथील पत्रकार परिषदेत शिंदे यांनी या उठावाला गद्दारी नव्हे तर अन्यायाविरोधातील लढा म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबतची भेट नक्कीच रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी सन्मानाने बोलावले तर नक्की जाऊ असे म्हटले होते. मात्र, आजूबाजूच्या काही लोकांना उद्धव ठाकरेंनी दूर ठेवावे असा सल्लाही केसरकरांनी दिला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची भेट घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.