आज लोकसभा निवडणूक झाली तर?

२०२४ लोकसभा निवडणुकीचे वेध आत्तापासूनच अनेक राजकिय पक्षांना लागलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दुसऱ्या काळातील तीन वर्षे पूर्ण केली आहेत.दरम्यान आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर काय होईल असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. या बाबत इंडिया टीव्ही-मॅटराईजने मिळून एक सर्व्हे केला आहे आणि त्यातून राजकीय अंदाजांना धक्का लावणारी माहिती हाती आलेली आहे. समजा जर आज लोकसभेच्या निवडणूका लागल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्व रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता आहे. ओपिनीअन पोलनुसार भाजपला ३६२, काँग्रेस नेतृत्वाखाली यूपीएला ९७ तर इतरांना ८४ जागांवर समाधान मानावे लागेल.
सध्या देशाचा कौल काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे करण्यात आलेला आहे. या सर्व्हे नुसार आज जर लोकसभा निवडणूक झाली तर भाजप पुन्हा एकदा बहुमत घेवून केंद्रात आपली सत्ता स्थापन करेल आणि अर्थातच हा करिष्मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य होईल असेही सर्व्हेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. भाजपाल २०१९ पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाजही सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान येथे भाजपला भरघोस यश मिळेल. तर दक्षिणेत काँग्रेस आणि युपीएची कामगिरी लक्षणिय ठरेल. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये आप आपले वर्चस्व राखून ठेवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.