हुंडा म्हणून टँकरच घेतलाय…!!

कोल्हापुरात कशासाठी लोक काय करतील याचा नेम नाही…गुरुवारीही तसेच घडले. मंगळवार पेठेतील खासबाग परिसरातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी प्रिन्स क्लबच्या वतीने नवदाम्पत्याची चक्क पाण्याच्या टँकरवरून रात्री वरात काढण्यात आली. या अभिनव अशा आंदोलनाकडे नागरिकही मोठ्या औत्सुक्याने पाहात असल्याचे दिसून आले. प्रिन्स क्लबच्या वतीने हे अभिनव आंदोलन करण्यात आले. या वरातीची चर्चा शहरात सुरू झाली.

व्हिडिओ – समीर देशपांडे

खासबागच्या प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते विशाल कोळेकर आणि अपर्णा साळुंखे हे गुरुवारी विवाहबद्ध झाले, त्यानिमित्ताने त्यांची महाद्वार रोड मिरजकर तिकटी खासबाग परिसरातून हलगी-लेझीम, घुमक्याच्या तालावर वरात काढण्यात आली.पाण्याच्या टँकरवर वधू-वराला बसवण्यात आले होते. समोर रिकाम्या घागरी ठेवण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या चावीला नियमित पाणी येत नाही म्हणून बायकोला त्रास नको त्याकरिता हुंडा म्हणून आम्ही पाण्याचा टँकर घेतलाय असा लक्षवेधी मजकूर या फलकावर होता. त्यांच्यापुढे महिला व मुले डोक्यावर रिकाम्या घागरी घेऊन हलगीच्या तालावर नाचत होते.

तोपर्यंत हनिमुनला जाणार नाही

त्या पाण्याच्या टँकरवर आणखीन एक लक्षवेधी वाक्य लिहिले होते, जोपर्यंत खासबाग परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही. यावरही जोरदार चर्चा रंगली. रात्री उशिरा नवरदेवांच्या गल्लीत पोचल्यावर नवदाम्पत्यांनी टँकरचा पाईप हातात घेऊन घरात पाणीपुरवठा केला. या वरातीचे संयोजन सचिन साबळे, अमित पोवार, रमेश मोरे, अभिजित पोवार, संजय पिसाळे, संदीप पोवार, स. ना. जोशी, अशोक पोवार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.