कॅनडाच्या भगवद्गीता पार्कमध्ये तोडफोड: 3 दिवसांपूर्वी अनावरण करण्यात आले, भारताने घटनेचा केला निषेध

कॅनडाच्या ओंटारियो राज्यातील भगवद्गीता पार्कच्या तोडफोडीचा भारताने निषेध नोंदवला आहे तसेच यावर कारवाईची मागणी सुद्धा केलीय. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनीही याला द्वेषपूर्ण गुन्हा ठरवत तपासाची मागणी केली. ब्रॅम्प्टन डाउनटाउनमधील हे उद्यान पूर्वी ट्रॉयर्स पार्क म्हणून ओळखले जात असे. त्याचे नंतर श्री भगवद्गीता पार्क असे नामकरण करण्यात आले आणि 28 सप्टेंबर रोजी त्याचे अनावरण करण्यात आले.
रविवारी चोरट्यांनी उद्यानाचा साइन बोर्ड फोडला. ब्रॅम्प्टन शहराचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेचा निषेध करताना ब्राउन म्हणाले – आम्ही शून्य सहनशीलतेचा दृष्टिकोन स्वीकारू. पोलीस अधिक तपास करणार आहेत. शक्य तितक्या लवकर पार्क दुरुस्त करण्यात येईल.
कॅनडामध्ये 1.6 दशलक्ष भारतीय वंशाचे लोक आहेत
ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही ब्रॅम्प्टनमधील श्री भगवद् गीता पार्कमधील द्वेषपूर्ण गुन्ह्याचा निषेध करतो. तसेच कॅनडाच्या संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर चौकशी करावी. कॅनडामध्ये भारतीय वंशाचे आणि अनिवासी भारतीय (NRI) 1.6 दशलक्ष लोक राहतात. या वर्षी येथे दोन हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आहेत.