ठाण्यातून उमटतोय नाराजीचा सूर ….पण का?

मुख्यमंत्री शिंदे विकासकामांसाठी तडफदारपणे निर्णय घेत आहेत. राज्यभर त्यांच्या सभांना हजारोंची गर्दी दिसते आहे. मंत्रिपदाच्या विस्तारानंतर आता जिल्ह्याला पालकमंत्रीसुद्धा देण्यात आलेले आहेत. पालकमंत्री पदावरुनच शिंदेच्या बालेकिल्ल्यात अर्थात ठाण्यात नाराजीचा सुर पहायला मिळतो आहे.
मिस्टर गुवाहाटी…काही तरी सोडा भूमिपुत्रांसाठी, नाही तर परत लढावं लागेल आमच्या अस्मितेसाठी अशी फेसबुक पोस्ट भाजपाचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी केलेली असून सोशल मिडियावर या पोस्टची जोरदार चर्चा होते आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांची वर्णी लागलेली आहे, त्यामुळे भाजपात नाराजी असून माजी नगरसेवकाच्या पोस्टमुळे ठाण्यात शिंदे गट विरुद्ध भाजपा असेच चित्र निर्माण झालेले आहे.
भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना डावलून ठाण्याचे पालकमंत्रीपद शंभूराज देसाई यांना का दिले असा सवाल उपस्थित केला जातोय. भाजप आणि शिंदे गटात सगळे काही ठिक आहे असे जरी सांगण्यात येत असले तरी स्थानिक स्तरावर मात्र मतभेद पहायला मिळतात. भाजप पक्षश्रेष्ठींकडून स्थानिक मतभेद कमी करावेत किंवा फोडाफोडीचे राजकारण करु नये अशा सुचना आलेल्या असल्या तरी नाराजी दिसून येतेच आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये तर हे शीत युद्ध सुरुच आहे. पण पालकमंत्र्यांच्या निवडीनंतर अधिक तीव्रतेने ते जाणवू लागले आहे.