वडिल शिंदेंकडे, मुलगा उद्धव ठाकरेंकडे ! नवे ठाकरे माध्यमांसमोर, Video पाहा

जयदेव ठाकरे म्हणदे उद्धव ठाकरे यांचे बंधु होय. अचानक जयदेव ठाकरे यांची चर्चा सुरु झाली कारण ते एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी मेळाव्यात दिसले. ठाकरे घराण्यातील असूनही जयदेव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पाठींबा दिल्याने त्यांची तुफान चर्चा झाली. फक्त जयदेव ठाकरेच नाही तर सून स्मीता ठाकरे, नातू निहार ठाकरे हे सुद्धा शिंदेच्या दसरा मेळाव्यात दिसले. एकिकडे शिंदेंच्या मेळाव्यातून जयदेव ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं. पण याच जयदेव ठाकरे यांचे सुपुत्र जयदीप यांनी मात्र काका उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात उपस्थीती लावली. आता तर जयदेव यांनी जाहीरपणे आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे जाहीर केले आहे.
मुलानेच वडिलांविरोधात भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेतील विशेषतः ठाकरे घराण्यामधील मतभेद सर्वांसमोर अधोरेखित झालेले आहेत. जयदेव ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे थोरले बंधू आहेत. तर जयदीप ठाकरे हे जयदेव ठाकरेंचे पुत्र असून ते एकत्र राहत नाहीत. जयदीप वांद्रे येथील एका मोठ्या कंपनीचे क्रिएटिव्ह हेड आहेत.एका वृत्तवाहिनीला त्यांनी पहिल्यांदा मुलाखत दिली त्यामध्ये जयदीप यांनी आपली भूमिका मांडली असून आणखी एक ठाकरे राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
मी या घराण्यातला सर्वात मोठा नातू असून मला उद्धव काका आणि आदित्यबद्दल आदर आहे. आजच्या अत्यंत विचित्र स्थितीत मी माझ्या कुटुंबाबरोबर असणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी उद्धव काकांच्या सभेला गेलो होतो असे जयदीप यांनी सांगितले. मात्र वडील जयदेव ठाकरे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलाय यावर जयदीप ठाकरे म्हणाले, मी क्रिएटिव्ह डायरेक्टर असून उद्धव ठाकरेंना वाटले तर माझ्यावर एखादी जबाबदारी टाकावी, तर ती मी स्वीकारेन. पक्षाला वाढवायला मी त्यांना नक्की मदत करेन असेही जयदीप यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाच्या संपर्कात मी नेहमी असतो, असे जयदीप ठाकरे म्हणाले. शिवसेनेत जे झालंय, ते कुणालाच पटलेलं नाही. अशा वेळेला सर्वच कुटुंबियांनी एकत्र आलं पाहिजे पण जे तसं करत नाहीयेत, त्याचं कारण इतरांना विचारा, अशी नाराजीही अप्रत्यक्षपणे जयदेव ठाकरेंबद्दल त्यांनी व्यक्त केली. मला लहानपणापासून आईने वाढवलं तसेच वडिलांशी माझा फारसा संपर्क नाहीये असे जयदीप यांनी वडीलांविरोधातील भूमिकेबद्दल सांगितलं.