3 वर्षानंतर अमरनाथ यात्रा सुरू

नुनवान बेस कॅम्पमधून 2,750 यात्रेकरूंचा जत्था दक्षिण काश्मीर हिमालयातील मंदिराकडे रवाना झाल्यामुळे वार्षिक अमरनाथ यात्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली. उपायुक्त पियुष सिंगला यांनी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील नुनवान बेस कॅम्प येथून यात्रेकरूंच्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. सिंगला यांनी 43 दिवसांची अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली.
यात्रेकरूंची पहिली तुकडी मंदिराकडे रवाना
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी बुधवारी जम्मू शहरातील भगवती नगर बेस कॅम्पला भेट दिली. त्यावेळी वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी 4,890 यात्रेकरूंची पहिली तुकडी काश्मीरच्या पहलगाम आणि बालटाल बेस कॅम्पसाठी रवाना झाली होती. श्री अमरनाथ श्राइन बोर्डने नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बर्फाच्या शिवलिंगाच्या ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था देखील केली आहे. सुमारे तीन वर्षांच्या कालावधीनंतर यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याने यावर्षी यात्रेकरूंची संख्या नेहमीपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणार्या घटनेतील कलम 370 मधील बहुतांश तरतुदी रद्द केल्यानंतर ही यात्रा मध्यंतरी पुढे ढकलण्यात आली होती, तर 2020 आणि 2021 मध्ये कोविड-19 जागतिक साथीच्या आजारामुळे यात्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र यंदा परिस्थितीत सुरळीत असल्याने अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले. ही यात्रा 11 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर संपणार आहे.