शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीवर इतका राग का?

शिवसेनेत आमदारांनी बंडखोरी केली आणि बंडखोरी करताना सगळं खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडलं. वारंवार शिवसेनेच्या आमदारांनी राष्ट्रवादीचे नाव घेतले. या आरोपांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.
मी राष्ट्रवादी संवाद यात्रा राज्यात केली होती. जिथे शिवसेनेचे आमदार आहेत त्या मतदार संघात मी गेलो होतो. शिवसेनेच्या आमदारांनी माझं स्वागत केलं. आमचं जेवण, चहापाणी एव्हढच काय आमच्या बैठकिंनासुद्धा त्यांनी हजेरी लावली.ज्या जिल्ह्यात आमची संवाद यात्रा झाली त्या जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या आमदारांचे माझ्या खात्यासंदर्भात जे काही प्रश्न होते ते मी निकाली काढले होते. यामुळे काय झालं शिवसेना आमदारांना तक्रारीचा काही मुद्दा मिळत नव्हता.
शिवसेनेच्या मतदारसंघात गेल्यावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक येत आहे त्याची तयारी करा हेच सांगितलं. कधीच कुठल्याच मतदारसंघात असं सांगितलं नाही की, इथे राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार निवडून येईल. नगरपालिका, जिल्हा परिषदा लढवा. विधानसभेला आपली आघाडी होणार आहे. आघाडी झाल्यानंतरची परिस्थिती बघून सांगू. आजच बोललो तर उगीच ती माणसं तिसऱ्या पक्षात जाऊ शकतात. त्या मर्यादा असतात, असंही जयंत पाटील यांनी सांगितले.
कसं आहे रडीचा डाव करायचा असेल तर काहीतरी कारणं द्यावी लागतात. मग काय सर्व आरोप राष्ट्रवादीवर करण्यात आले. उलट राष्ट्रवादीने केली तितकी कामे शिवसेनेच्या आमदारांची कुणीच केली नसतील. आमच्याकडे असणाऱ्या सर्व खात्यांनी. खासगीत विचारलं तर ते सांगतील अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली आहे.
शिवसेनेचे आमदार निधीबदद्ल बोलले सर्व आमदारांना भरपूर पैसे मिळाले आहेत. ते चुकीची आणि खोटी बातमी सांगतात. प्रत्येकाला तीनशे, चारशे, पाचशे कोटी मिळालेले आहेत. त्यांना जिथे तीन-चार कोटी मिळायचे तिथे अजित पवारांनी दहा-पंधरा कोटींचा निधी दिला असा दावा देखील जयंत पाटील यांनी केलाय