शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत नाराजीनाट्य?

शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरु झालं आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली. या निर्णयामुळे राष्ट्रवादीत नाराजी असल्याचे समोर येते आहे. अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी दिल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक नेता म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पाहिले जाते. गृह, वित्त, ग्राम विकास यासह अनेक मंत्रालयांचं नेतृत्व त्यांनी केलेल आहे. पण अजित पवारांना विरोधी पक्षनेते दिल्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जातेय. याबाबत अशी माहिती हाती आलीय की जयंत पाटील एवढे नाराज होते की अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्याचे पत्र सभापतींना देण्यास त्यांनी नकार दिला होता. राष्ट्रवादीच्या सुत्रांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादीचे ज्य़ेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दोनवेळा पाटलांना फोन करुन राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ३६ आमदारांनी विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांची निवड करून त्यांना पाठिंबा देण्याच्या पत्रावर आधीच स्वाक्षरी केली आहे.
दरम्यान पाटील यांनी ही नाराजी औपचारिकपणे नाकारली असून भाजपमध्ये जाणार असलेल्या चर्चा देखील खोडून काढलेल्या आहेत. मात्र त्यांना विरोधी पक्षनेता व्हायचं होतं हे कबूल केलेलं आहे. पण त्याचवेळी अजित पवारांना त्या पदावर नियुक्त करण्याच्या निर्णयाला मी स्वतः पाठिंबा दिला असेही सांगितले.