केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची ही असेल नवी तारीख….

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा खेळाडू केएल राहुल यांचं लवकरच लग्न होणार अशी चर्चा सातत्यानं सुरू आहे. हे दोघंजण येत्या तीन महिन्यांत लग्न करणार असल्याचं सांगितलं जात होतं, परंतु ही बातमी खोटी असल्याचं अथियानं सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं. त्यानंतर डिसेंबरमध्ये सुनील शेट्टी त्याच्या मुलीचं लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली, परंतु आता अथिया आणि राहुल यांचं लग्न यंदाच्या वर्षी होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाच्या प्लॅनमध्ये काही बदल केल्याचं सांगितलं जात आहे. पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये या जोडप्याचा विवाह होऊ शकतो.
दरम्यान, अथिया आणि केएल राहुल यांनी मुंबईत नवीन घर घेतल्याचीही चर्चा आहे. दोघांनी पाली हिलमध्ये असलेल्या संधू पॅलेस इमारतीमध्ये नवीन घर विकत घेतलं आहे. या घराचं काम अजून सुरू आहे. सध्या ‘वास्तू’मध्ये आलिया व रणबीर या दोघांचा निवास आहे. लवकरच तेदेखील अथिया आणि राहुलच्या बाजूच्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहेत