नोकरी सोडून बिझनेसचा विचार करताय?

नोकरीपेक्षा बिझनेसच बरा असा विचार अनेकजण करत असातत.पण तुम्हाला माहितीये का, जर बिझनेसच्या फक्त बाहेर दिसणाऱ्या चकाचक गोष्टी पाहून तुम्ही भाळून जात असाल, बिझनेससाठी थेट नोकरी सोडून देण्याचा विचार करत असाल तर हा निर्णय तुमच्यासाठी अतिशय धाडसाचा ठरु शकतो. हा निर्णय तुम्ही जरुर घेऊ शकता, पण अतिशय काटेकोर आर्थिक नियोजनानंतरच. नाहीतर बिझनेसमधून आनंद मिळणं तर दूर पण पश्चातापाची वेळ येऊ शकते

नोकरी सोडण्यापूर्वीच बिझनेसचा पाया रचा

आपल्याला जो काही बिझनेस करायचा असेल त्याचा पाया नोकरी सोडण्यापूर्वीच रचायला सुरुवात करा. नेमका बिझनेस प्लॅन काय आहे, तो कसा अंमलात आणायचा, त्यासाठी आवश्यक असलेला पैसा कसा उभा करायचा, या सगळ्याचा विचार करणं म्हणजे पाया रचणं आहे. त्यामुळे बिझनेसचा पाया रचल्याशिवाय, बिझनेस यशस्वी करुन दाखवू याबाबत आपल्याला आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत नोकरी सोडण्याचा विचार करु नये.

आठवड्याला सुटी मिळेलच असं नाही

नोकरदारांसाठी आठवड्याची सुटी अतिशय आनंदाची असते. कधी एकदा सुटीचा दिवस येतोय, याची वाट बघितली जात असते. बिझनेस करताना सुरुवातीच्या काही काळासाठी तर ही सुटी विसरुन जावीच लागते. त्यामुळे व्यावसायिक जीवन सांभाळताना वैयक्तिक जीवनावर त्याचा परिणाम होणार, याची तयारी असायलाच हवी. तेव्हा स्वतःसाठी वेळच मिळत नाही ही तक्रार करुन चालत नाही.

यश मिळण्यासाठी संयम गरजेचा

आपण आपल्या जवळचं एखादं उदाहरण पाहिलेलं असतं, त्यात त्या व्यक्तीला कमी कालावधीत यश मिळाल्याचं आपल्याला दिसतं. त्याला पाहून आपल्यालाही असंच लवकर यश मिळेल असं वाटायला लागतं. पण तसं होईलच असं नाही. प्रत्येक बिझनेस वेगळा असतो, प्रत्येक बिझनेसला उभं रहायला पुरेसा वेळ द्यावा लागतो.

ठराविक रकमेचं गणित नाही

नोकरी करत असताना आपल्याला ठराविक रक्कम मिळत असते. त्या रकमेनुसार आपण आर्थिक नियोजन करु शकतो. बिझनेस करताना सुरुवातीच्या काही महिन्यात, वर्षात हे ठराविक रकमेचं गणित आपल्याला शक्य होईलच असं नाही. एखाद्या महिन्यात अपेक्षेपेक्षा जास्त नफा तर एखाद्या महिन्यात अपेक्षेपेक्षा अतिशय कमी नफा आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे हे पैशांचं नियोजन कोलमडू शकतं. 

वेळेचं बंधन झुगारावं लागतं.

नोकरी करताना आपण प्रत्येक दिवशी ८ – ९ तास काम करतो. त्यानंतरचा वेळ आपला असतो. बिझनेस सुरु करताना वेळेचं बंधन झुगारुन द्यावं लागतं. तो संपूर्ण बिझनेस, काम आपलं आपल्यालाच उभं करायचं असल्याने तिथे ८ – ९ तासच काम करेल, असा विचार करुन चालत नाही. एकूणच वेळेचं बंधन झुगारुन बिझनेसमध्ये उतरावं लागेल. शिवाय, नोकरी करताना आपल्या मदतीला बरीच व्यवस्था तयार असते. बिझनेस सुरु करताना ती व्यवस्था नसते. ती आपल्याला हळूहळू तयार करावी लागते. 

नोकरी आणि बिझनेस या दोन्हींमध्येही काही चांगल्या, काही आपल्याला न पटणाऱ्या बाबी आहेत. त्यामुळे नोकरी वाईट, बिझनेस चांगला अशी वर्गवारी करुन चालत नाही. आपण आपल्या स्वभावानुसार, मेहनती करण्याच्या तयारीनुसार, सगळा विचार करुनच नोकरी की बिझनेस हा निर्णय घ्यावा. हातात चांगली नोकरी असेल, तर ती सोडून बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर वर सांगितलेल्या मुद्यांचा नक्की विचार करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.