भाजपची एक घोषणा आणि आढळरावांचे टेन्शन वाढले!! कारण?

लोकसभा २०२४ साठी भाजपने जय्यत तयारी सुरु केलीय. देशभरातील लोकसभा मतदारसंघ निवडून त्यावर चाचपणी सुरु आहे. यासाठी खास केंद्रीय मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या विशेष सभा,बैठका आणि चर्चासत्र होणार आहे. महाराष्ट्रातसुद्धा केंद्रीय मंत्र्यांचा दौरा सुरु झालाय. महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजपचं सरकार आहे. तरी शिंदे गटातील काही नेत्यांचे टेन्शन वाढलेले पहायला मिळतेय त्यातील एक नाव आहे शिवाजीराव आढळराव पाटील !  

तीन टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचं टेन्शन वाढवलं आहे भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी ! ज्या लोकसभा मतदारसंघात विरोधकांचे सरकार आहे तिथे भाजपने आपला मोर्चा वळवला आहे. केंद्रीय मंत्री रेणुका सिंग या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी अनेक भाजप कार्यकर्ते आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. त्यात आमदार माधुरी मिसाळ यांनी शिरूर लोकसभेत यंदाच्या वेळी कमळाचा उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला.त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांचं टेन्शन वाढलंय.

शिवाजीराव आढळराव पाटील गेली १५ वर्ष शिवसेनेकडून खासदार राहिले होते. पण २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला हा पराभव आढळरावांच्या खूप जिव्हारी लागला. कारण आढळरावांसारख्या दिग्गज नेत्याला अस्मान दाखवायचं म्हणजे साधंसोपं काम नव्हतं मात्र अमोल कोल्हेंची सगळं काही असं जुळवून आणलं आणि पहिल्याच फटक्यात संसद भवनात पाऊल ठेवलं.राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतरही आढळराव आणि अमोल कोल्हे यांचं पटायचं नाही.महाविकास आघाडी असती तर विद्यमान खासदार म्हणून लोकसभेला पुन्हा अमोल कोल्हे यांनाच संधी मिळाली असती, अशी भीती आढळरावांना होती.

आता शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटात आहेत.शिंदे गट आणि भाजपची युती आहे.भाजपने लोकसभा २०२४ ची तयारी केलीय त्यात शिरुर लोकसभा मतदार संघावर भाजपचं खास लक्ष आहे. भाजपची चाचपणी आणि त्यात पुन्हा भाजप आमदाराचा ‘शिरुर’ जिंकायचा निर्धार याने आढळरावांचं टेन्शन नक्की वाढणार यात शंकाच नाही.आता प्रश्न येतो जर भाजप आमदाराने शिरुर लोकसभा मतदारसंघ जिंकायचा निर्धार केलाय. तर आढळराव पाटलांना हा मतदारसंघ सोडायला लागणार का? तसं झालं तर आढळराव कुठल्या मतदारसंघातून उभे राहणार? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.