अजित पवारांची विरोधी पक्षनेते पदी निवड,विधानसभेत रंगणार दादा विरुद्ध भाई !!

राज्यात शिवसेनेतील बंडखोर आणि भाजपचे सरकार आल्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज विधानसभा अध्यक्षांना याबाबतचे पत्र देण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधी बाकांवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांची वर्णी लागेल याबाबत चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची नावे आघाडीवर होती. अखेर पक्षाने अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. याबाबतचे अधिकृत पत्र विश्वास दर्शक ठराव मतदानानंतर विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे.
सरकारमध्ये असताना अजित पवार यांची प्रशासनावर मजबूत पकड होती. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांचा प्रशासनात आदरयुक्त धाक होता. त्याशिवाय अजित पवार आपल्या वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जातात. त्यामुळे अजित पवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांना त्यांच्या टीकेचे बाण सहन करावे लागणार आहेत.