श्रीमंत आमदाराला भाजपकडून मोठं गिफ्ट?

शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या होवू शकतो. पहिल्या टप्प्यात १५ ते १८ मंत्री शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर फोन गेल्याचं समजतं आहे. त्यामुळे राज्य भाजपमधील ४ मोठी नावं शिंदे सरकारमध्ये आहेत असे स्पष्ट झालेले आहेत. दरम्यान भाजपकडून आलेल्या एका नावाच्या सगळीकडे चर्चा होते आहे आणि ते नाव आहे आमदार मंगलप्रभात लोढा. भाजपने मंत्रिपदासाठी जी नावे अंतिम केली आहेत त्यात लोढा यांचे नाव असल्याचे बोलले जाते आहे.
देशातील श्रीमंत बिल्डर अशी मंगलप्रभात लोढा यांची ओळख आहे. फोर्ब्सच्या यादीमध्येही लोढा यांचे नाव आलेले आहे. रिअल इस्टेटमधील एक मोठं नाव म्हणून लोढा यांचे नाव घेतले जाते. २०१९मध्ये मलबार हिल मतदारसंघातून ७० हजाराहून अधिक मताधिक्याने लोढा निवडून आले होते.मुळचे जोधपूर असणारे लोढा १९८१ मध्ये मुंबईत आले आणि त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केला.
मुंबई भाजपचे अध्यक्षपद लोढा यांच्याकडे आहे. मुंबईमधील मारवाडी समाजातील भाजपचा प्रमुख चेहरा ही लोढा यांची ओळख आहे. १९९५ पासून सलग सहावेळ मंगलप्रभात लोढा विधानसभेवर निवडून गेले पण त्यांना एकदाही मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं.