मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? समोर आलं महत्वाचं कारण

राज्यात सध्या एकाच प्रश्नाची सर्वात जास्त चर्चा होते आहे. अगदी राजकारण्यांपासून सामान्य जनता सुद्धा हाच प्रश्न विचारते आहे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आहे. शिंदे सरकार येवून एक महिना झाला तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारभार पाहत आहेत. वारंवार शिंदे गटातील प्रवक्ते आणि आमदार तारखा देत आहेत पण मंत्रिपद विस्तार पुढे पुढे जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची दिल्लीवारी अनेकवेळा झालेली आहे पण मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळत नाहीए.मंत्रिमंडळ विस्ताराला घाबरता का असा सवालसुद्धा विरोधक विचारत आहेत.
राज्यात गुजरात पॅटर्न राबविण्याची तयारी असल्याचं सांगितलं जातय मात्र महाराष्ट्रातील प्रादेशिक, जातीय आणि संघटनात्मक गणिते पाहता राज्यात ते शक्य होणार नाही. तरी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार अजूनही कायम आहे. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली असून अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. आता ८ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं जातं की कोर्टाकडून अजून काही निकाल येतो हे पाहणं महत्त्वाच आहे. दरम्यान कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.खरंतर अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त का मिळत नाही या प्रश्नाचं ठोस उत्तर कोणाकडेही नाही. कारण आज-उदया किंवा दोन दिवसात, तीन दिवसात अशीच उत्तर मिळत आहेत. तेव्हा कदाचित कोर्टाच्या निकालानंतरच याचे उत्तर मिळू शकेल.