मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं ! कुणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराची अखेर तारीख ठरलेली आहे. उद्या सकाळी अकरा वाजता राजभवन येथे काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर बैठक झालेली आहे. त्यात अंतिम यादीवर फेरबदल झाले असून अंतिम यादी निश्चीत करण्यात आलेल आहे. १५ ते २० मंत्री यावेळी शपथ घेतील अशी देखील माहिती आहे. तर दुसरीकडे विधीमंडळात सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे.
स्वातंत्र्य दिन जवळ येतो आहे आणि यंदा तर स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे झेंडावंदन कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्त करणं गरजेचं आहे. शिवाय विरोधक रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी उदायच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मविआ सरकारमध्ये जे मंत्रिपदावर होते त्यांनाही नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे बोलले जाते आहे. उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभुराजे देसाई, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर तर अपक्षाकडून बच्चू कडू, राजेंद्र पाटील येड्रावकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर,नीतेश राणे या नावांची चर्चा आहे.