महाराष्ट्रात शिंदे-भाजप सरकार

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गट आणि भाजपाने १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. तर तीन आमदार तटस्थ राहिले.
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. सुरुवातीला आवाजी मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी कऱण्यात आली. यावेळी भाजपा-शिंदे सरकारने १६४ मतांसहित बहुमताचा आकडा पार केला आणि विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली.
राज्यात १० दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडलं आणि शिंदे-भाजपा सरकार आलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्याचवेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. यानंतर आता शिंदे-भाजपा सरकारने आपल्याकडे बहुमत असून सहजपणे विश्वासदर्शक ठराव जिंकू असं म्हटलं होतं. त्यानुसार आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकारवर शिक्कामोर्तब झालं आहे.