राज ठाकरे आज ‘वर्षा’वर, मनसे- शिंदे गट युती होणार?

राज्यातील गणेशोत्सव विशेष करुन मुंबईमधील गणेशोत्सवाला राजकीय सत्तानाट्याची किनार दिसून येतेय. अगदी केंद्रीतील मंत्री सुद्धा मिशन मुंबई व्हाया गणेश दर्शन करायला आले होते. गणपती दर्शनाच्या निमित्ताने सर्वच नेते एकमेकांच्या गाठीभेटी घेतायेत. सत्तास्थापना, शह-काटशह या सगळ्याबद्दलची रणनीती यानिमित्ताने आखली जातेय. आज याची खास चर्चा होतेय कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाणार आहेत. त्यामुळे मनसे – शिंदे गट युतीच्या चर्चा रंगत आहेत.

मुंबई महापालिका निवडणुक जवळ येतेय. त्यानिमित्ताने सर्व पक्ष जोरात तयारी करत आहेत. यंदा शिवसेना – भाजपा आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ दिसून येत आहे. या निवडणुकांसाठी रणनीती आखण्याची तयारी सुरू आहे. याच संदर्भात मनसेसोबतही जवळीक वाढवण्याचा शिंदे गट आणि भाजपाचा प्रयत्न दिसून येतोय.अनेक भाजपा नेते राज ठाकरेंची भेट घेत आहेत. राज ठाकरेंना दसरा मेळाव्याला बोलवण्याच्याही चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, आज राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शासकीय निवासस्थान वर्षावर जाणार आहेत. यामागचं प्राथमिक कारण जरी गणपतीचं दर्शन असलं तरी त्यामागे शिंदे गटासोबत युतीच्या चर्चांचं तर नियोजन नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय.आता दोन्ही पक्षांचे नेते जेव्हा याबद्दल स्पष्ट बोलतील, तेव्हा चित्र अधिक स्पष्ट होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.