कोथरुडमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ !

महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. ‘कुस्तीचा कुंभमेळा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा पुण्यातील कोथरुडमध्ये होणार आहे. पुण्यातील संस्कृती प्रतिष्ठानामार्फत यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. संस्कृती प्रतिष्ठानाचे संस्थापक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांना या स्पर्धेबाबतची माहिती दिली. या वर्षाच्या अखेरीस डिसेंबर-2022 मध्ये पुण्यातील कोथरुड येथे 6 दिवस ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत 900 कुस्तीगीर सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांतील 11 महापालिकांमधील 45 तालीम संघातील 900 मल्ल ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहेत. शिवाय, नामांकित 40 मल्ल या स्पर्धेत भाग घेणार असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली. तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी स्पर्धेचे ठिकाण कोथरूड हेच असेल, असे मोहोळ यांनी सांगितले आहे.