Vedanta Foxconn: देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले

वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून राज्यभर शिंदे सरकारविरोधाक आंदोलन सुरु झालंय. दरम्यान या प्रकरणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडलंय.दोन दिवसांनंतर या प्रकरणात त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल फडणवीस यांनी वेदांता समूहाचे अनिल अग्रवाल यांचे आभार मानलेत. तर, सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांवर फडणवीस यांनी निशाणा साधलाय.राजकीय स्वार्थसाठी निराधार दावे केले जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटलंय.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून म्हटले की, वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अनिल अग्रवाल यांचे आभार मानतो. महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू असेही फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटल आहे.
केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत. महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? असा सवालही त्यांनी केला आहे.