याकुब मेमनच्या भावाचे फडणवीसांसोबत काय कनेक्शन?

महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा वादळ पहायला मिळतंय. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीच्या सजावटीवरून सुरु असणारे आरोप-प्रत्यारोप थांबत नाहीत तोपर्यंत आता त्याच्या चुलत भावाची या प्रकरणात एन्ट्री झालीय. रऊफ मेमनचं राजकीय कनेक्शन समोर आलंय. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो ट्वीट केलाय.रऊफ मेमन हेच का असा प्रश्न त्यांनी विचारलाय. 

याप्रकरणी भाजपने मेमनच्या कबरीच्या सजावटीसाठी रौफ मेमन आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात बैठक झाली होती, असा आरोप शिवसेनेवर केलाय. शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा रऊफ मेमनबरोबर बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झालाय.रऊफ मेमन याने याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीसाठी टायगर मेमनच्या नावाने धमकी दिली असल्याचा आरोप आहे. किशोरी पेडणेकर यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले 

किशोरी पेडणेकर यांनी आरोप फेटाळलेत. तर, दुसरीकडं शिवसेनेनं व काँग्रेसनं भाजपवर पलटवार केलाय. किशोरी पेडणेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.त्यात फडणवीस रऊफचे स्वागत, सत्कार करताना दिसतायेत. भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे असे टोलाही त्यांनी लगावला. किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट केलेल्या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील दिसत आहेत.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. बडा कब्रस्तानच्या ट्रस्टींना टायगर मेमनच्या नावाने धमकी देण्यात आली. त्याची तक्रार करण्यात आली. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप करत, महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि मेमन कुटुंबियांशी असलेल्या संबंधांची चौकशीची मागणी भातखळकर यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.